सतारवादन एक प्रवास

मध्यंतरी एका कामानिमित्त प्रसिद्ध सतारवादक रवींद्र चारी ह्यांच्या भेटीचा योग आला त्यानिमित्ताने त्यांचा सतारवादनाचा प्रवास आणि एकंदर सतारवादनाचा प्रवास ह्याबाबत चर्चा झाली .एक अभिजात शास्त्रीय वादक तसेच एक संगीत जाणकार अशी पं. रवी चारी ह्यांची ओळख आहे त्यांच्याशी सध्याच्या संगीताबद्दल तसेच त्यांच्या सांगितिक प्रवासाबद्दल मारलेल्या गप्पा.....




आज तरुण पिढीचा चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितल जात तर तुमचा सतार वादनातला प्रवास कसा झाला ?
माझ्या सतार वादनातील प्रवास प्रामुख्याने माझ्या वडिलांमुळे झाला कारण लहान असताना त्यांनी मला सतार आणून दिली आणि सतार हे वेगळे वाद्य म्हणून त्यांनी माझ्या हातात दिलं.सुरवातीला मी गोव्याचेच माझे गुरु अब्दुल करीम खान साहेब ह्यांच्याकडे शिकायला लागलो आणि अशा रीतीने गोव्यातून सतार वादनातील माझा प्रवास सुरु झाला
त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षण सतारीत घेतल्यानंतर मी काही काल पुणे ते मुंबई असा प्रवास केला आणि प्रवासाच्या दरम्यान मला अनेक गुरूंचे मार्गदर्शन लाभल.पण वेळोवेळी या मार्गदर्शनामध्ये दोन मोठे दीपस्तंभ जे माझ्या आयुष्यात आले होते आणि मज्या शेवटच्या श्वासापर्यंत राहतील ते म्हणजे माझे गुरु पद्मभूषण उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान आणि पद्मश्री उस्ताद शाहीद परवेज म्हणजे आज जो माझा सतार वादनाचा प्रामुख्याने प्रवास झालेला आहे त्याच्यामध्ये महत्वाचा ठसा या दोन गुरु आणि मार्गदर्शकांमुळे मी उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे

तुमच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉईंट कोणता म्हणता येईल ?
हे पहा सांगितिक कारकीर्द घडत असते तेव्हा त्याच्यामध्ये एखाद-दुसरा टर्निंग पॉईंट नसतो.कारण हा रस्ता तसा वळणावळणांचा असतो आणि प्रत्येक वळण तुम्हाला एका मुख्य प्रवाहाकडे किंवा मुख्य हमरस्त्याकडे नेऊन सोडत असतं.तर माझ्या आयुष्यात असे टर्निंग पॉईंट आले पहिलाच टर्निंग पॉईंट जर तुम्ही म्हणाल तर लहानपणी  जेव्हा वडिलांनी हातात सतार दिली तो.कारण मी तेव्हा तबलाही वाजवायचो,मी संवादिनीही वाजवायचो,मी गायचो सुद्धा;अनेक बंदिशी मला मुखोद्गत आहेत.अनेक बंदिशी मी अजूनही गातो.दुसरा टर्निंग पॉईंट म्हणजे वडिलांच्या नंतर ज्यांना मी वडील कम गुरु मानतो ते उ.अब्दुल हलीम जाफर खान किंवा उस्ताद शाहीद परवेज,सातत्याने लाभलेला मोगूबाईंचा सहवास,पं.सुरेशदादांचा सहवास हे सारेच माझ्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट म्हणता येतील.एवढचं नाही तर मी जेव्हा सतारवादक म्हणून नावारूपाला येऊ लागलो तेव्हा माझ्या उमेदीच्या काळात मी त्रिलोक गुर्टूसारख्या जागतिक पर्कशनिस्टबरोबर दौरे केले आहेत म्हणजे आज माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कि जगाच्या नकाशात असे फार थोडे देश आहेत की जिथे मी त्रिलोक गुर्टू किंवा सलीफ केत ह्यांच्याबरोबर वाजवलेल नाही.

तंत्रज्ञानाचा संगीतावर प्रभाव ह्यावर बरेच मतप्रवाह आढळतात तर ह्याबाबत तुम्ही काय सांगाल?
तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे ह्याबाबत काही दुमत नाही परंतु संगीत ही गुरुमुखी विद्या आहे.हल्ली अस म्हटल जात कि युट्युब किंवा व्हॉटस अॅपच्या माध्यमातून किंवा टेक्नोलॉजीच्या आधारे एखाद्याची कॉपी करू शकता.काही अंशी हे खर आहे पण एखादा कसा वाजवतो ह्याच तुम्ही अनुकरण करू शकता,ते पाहू शकता,त्यावरून तुम्हाला ज्ञान मिळेल.परंतु जर तुम्हाला खरोखर गुरुविद्या यायची असेल तर त्याला गुरुमुखी विद्याच आवश्यक आहे.त्यामुळे जरी कितीही आल तरीही त्याला गुरूविद्येची सर नाहीच.कॉम्पुटरने आपण बेसूर झालेली गायिका आपण सुरामध्ये आणू शकतो पण तंत्रज्ञान असले तरी चांगले पण त्याचा अतिरेक होता कामा नये आपण कितीही तंत्रज्ञान आणि संगीत हे जरी म्हटलं तरी संगीताकरिता मला अस वाटत कि गुरु आणि शिष्य ह्यांचा परस्पर प्रवाह समोरासमोर बसूनच जितका चांगला होऊ शकतो तेव्हढा योग्य म्हणता येईल.


सतार वादनाचे भविष्य काय आणि त्यातील उपलब्ध संधी तसेच सध्याच्या तरुण वाद्कांविषयी तुम्ही काय सांगाल?
अभिजात संगीत हे कधीही लोप पावू शकत नाही जस आपण म्हणतो कि जेव्हा मनुची निर्मिती झाली तेव्हा ही सृष्टी निर्माण झाली ह्या सृष्टीवर अनेक अत्याचार झाले पण सृष्टीचा अंत आहे का? सृष्टी तग धरून राहिलेली आहे तसच सतारवादन अभिजात आहे आणि त्याला आदी किंवा अंत असे काहीच नाही.सतार वादनाला उज्वल भविष्य आहे आणि त्यामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत.पूर्वीच्या काळी सतारवादन फक्त मैफिलीपुरते मर्यादित होते पण आज सतार वादन पश्चात्य संगीताबरोबर वाजवलं जात.तसच फ्युजन हा वादन प्रकार आलेला आहे.तुम्ही शास्त्रीय मैफिलींमध्ये वाजवू शकता,चित्रपटामध्ये वाजवू शकता;आता तर संगीतातून रोगउपचार (disease healing) हे पण एक टेक्निक आहे.तरुण वाद्कांविषयी सांगयचं झाल तर तरुण वादक पुष्कळ आहेत आणि ते तयारीनेही वाजवतात परंतु मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे हे तरुण वादक वाजवतात चांगल परंतु त्यात तालमीचा अभाव आहे.’तयारी’ आणि ‘तालीम’ , बघा दोन्ही गोष्टी त वरून सुरु होतात.त्यांच्याकडे ह्या दुसऱ्या ‘त’ चा अभाव आहे आणि तालीम करण अत्यंत गरजेच आहे अस मला वाटत.

परदेशात तुम्ही अनेक दौरे केले आहेते तर शास्त्रीय संगीताची जगभरात कशा प्रकारची प्रतिमा आहे ?
शास्त्रीय संगीताची जगभरात अतिशय उज्वल प्रतिमा आहे कारण जेव्हा आम्ही भारतीय वादक परदेशात जातो तेव्हा प्रथमतः आमच्याकडे एका आकर्षणानेच पाहिलं जात,कारण जगभरात भारतीय शास्त्रीय संगीताचा एक वेगळा प्रभाव आहे.आणि त्या प्रभावातून त्यांना सतार हे वाद्य सुद्धा वेगळ वाटत.त्यांच्याकडे गिटार,पियानो किंवा सॅक्सोफोन असतो त्यामध्येच आम्ही फ्युजन करतो तर हे कस आहे कि आमची मेलडी,लयकारी,फास्ट वाजवण त्यांना आवडतं.
तुमचा स्वताचा रवी चारी क्रॉसिंग हा अल्बम लोकप्रिय झाला आहे त्याला GIMAसाठी नॉमिनेशनदेखील मिळालं आहे तर आमच्या वाचकांना त्यामागची संकल्पना जाणून घ्याला आवडेल...

जसं मी तुम्हाला म्हटल कि मी अभिजात सतार वादक आहे आणि शास्त्रीय वादनात जेव्हा मला प्राविण्य मिळू लागल किंवा जशी माझी उमेदीची वर्ष सुरु झाली तेव्हा एक टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यात आला तो म्हणजे त्रिलोक गुर्टू ह्यांचा प्रवेश माझ्या आयुष्यात झाला त्यांच्यासोबत वेगवेगळे पाश्चात्य वादनाचे प्रयोग ,कार्यक्रम भारतात तसेच परदेशात केले तेव्हा ह्या संकल्पनेच बीज रोवल गेले.आपल्याला कल्पना असेलच की कलाकाराच मन हे नेहमीच क्रीएटिव्ह असते आणि अशीच एक कल्पना माझ्या मनात रुजली आणि रवी चारी क्रॉसिंग हा अल्बम तयार झाला.गंमत म्हणजे ह्या अल्बमचं नॉमिनेशन आम्ही ज्यांना संगीतातील संत मानतो असे पद्मभूषण ‘उ.झाकीर हुसैन’ यांनी केलेलं आहे.आणि ही माझ्यासाठी अत्यंत मोलाची गोष्ट मी मानतो.या अल्बममध्ये मी वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गाण ही वेगळी स्टाईल आहे.त्यातही गंमत म्हणजे भारतातील अनेक नामवंत कलाकारांनी ह्यात काम केलेलं आहे.नावच सांगायची झाली तर तौफिक कुरेशी,श्रीधर पार्थसारथी,लुई बँक्स,जीनो बँक्स,शिवमणी,रणजीत बारोट अशा अनेकांनी यामध्ये वाजवल आहे.परंतु सतार हा माझा मुख्य भाग आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की रसिकांना हे समीकरण अतिशय आवडल आहे.

तबलानवाझ उत्साद झाकीर हुसेन ह्यांच्या सोबत तुम्ही वादन केले आहे तो अनुभव कसा होता ?

जेव्हा लोखंडाला परीस्पर्श होतो तेव्हा लोखंडाचा सोनं होत अशी आपली पुर्वापार  भावना आहे. झाकीरभाई हे माझ्या दृष्टीने  संगीतातील एक परीस आहेत, ज्यांचा ज्यांचा स्पर्श झाकीरभाईना झाला आहे त्यां च्या  आयुष्याच त्यांच्या संगीतकलेच सोनं झालेलं आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी  उस्ताद पद्मभूषण झाकीर हुसेन यांच्याबरोबर वादन केलेलं आहे तेव्हा मला असं वाटलेलं कि मी कुठेतरी हिमालयाच्या पायथ्याशी आहे आणि माझ्या समोर प्रचंड हिमालय उभा आहे आणि मी एक छोटासा ‘टीप ऑफ आइसबर्ग’ आहे.त्यांच्या बरोबरील प्रत्येक वादनाबरोबर मला कमालीचा आनंद,नवीन काहीतरी शिकायला मिळालं आहे.एका नव्या उर्जेचा आनंद,एका नव्या सृजनाचा आनंद म्हणजे उस्ताद झाकीर हुसैन ह्यांच्यासमवेत वाजवणे आहे.

आता शेवटचा प्रश्न जाता जाता तरुणाईला काय संदेश द्याल ?
तरुणाईला संदेश मी एवढाच देईन कि संगीतात रहा,संगीताच्या चिंतनात रहा.सतत संगीत साधनेत गुंग व्हा आणि नुसत वाजवू नका तर तालीम घ्या.तालीम अतिशय महत्वाची आहे तालीम असेल तरच अभिजात संगीतात तुम्ही कुठेतरी पुढे याल.चांगल्या गुरूंना मार्गदर्शक बनवा,प्रत्येक घराण्यातील काहीतरी चांगल शिका,चांगल्या लोकांच्या सहवासात रहा असाच माझा तरुणाईला संदेश राहील.

Comments